
एलियन, 'नेटिव' नसलेले. त्यांना 'एक्स्ट्राटेरेस्ट्रीयल' असंही म्हणतात. म्हणजेच, जे जीव मूळचे पृथ्वीवरील नसून कोणत्यातरी इतर ग्रहावरील अथवा अवकाशातील आहेत ते. मग अगदी ते लहानशा सूक्ष्म्जीवापासून ते एका अजस्त्र 'राक्षसा'पर्यंत कोणीही असो..!!थोडक्यात सांगायचे झाल्यास 'जे पृथ्वीवरील नाहीत, ते सर्व एक्स्ट्राटेरेस्ट्रीयल होय'. याउलट 'एलियन' या संज्ञेचा अर्थ 'स्थानिक/नेटिव नसलेले' असा होतो. उदाहरण द्यायचेच झाल्यास जर वाघासारखा आशियाई पशू जर अमेरिकेच्या जंगलात सोडला, तर तो अमेरिकेसाठी 'एलियन' आहे. त्याचप्रमाणे धृवीय अस्वल हे भारतीयांसाठी 'एलियन' ठरते. थोडक्यात, परग्रहावरील जीवांसाठी 'एक्स्ट्राटेरेस्ट्रीयल' असा शब्दप्रयोग अधिक उचित असला, तरीही 'एलियन' असा शब्दप्रयोग अधिक रूढ झालेला आहे.
आपले विश्व हे सुमारे १३.८ अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आले, असे सर्वसाधारणपणे (विज्ञानाने) मानलेले आहे. मग ते कसे अस्तित्वात आले, काय झाले, महास्फोट(बिग बॅंग) झाला कि ईश्वराने(?) निर्माण केले; हा वेगळा विषय. पण, या अब्जावधी वर्षांत अनंत दीर्घिका(गॅलेक्सी) निर्माण झाल्या, नष्ट झाल्या व ही प्रक्रिया अजूनही चालूच आहे. काळाच्या ओघात तारकासमूह बनले, नष्ट झाले. अशाच एका दीर्घिकेत(The Milky Way) आपली 'सूर्यमाला' हा तारकासमूह अस्तित्वात आला, व त्यातील सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकाच्या पृथ्वी नावाच्या ग्रहावर आपण राहतो. हे सर्व जितके आश्चर्यकारक व अफाट आहे, तितकेच गूढ व अज्ञातही आहे. सजीवसृष्टी फक्त पृथ्वीवरच अस्तित्वात आहे का? आपण सगळे याच ग्रहावर अस्तित्वात आलो का? की एखाद्या दुसऱ्या ग्रहावरून आलेल्या 'देवतां'नी येथे 'स्थायिक' होऊन मानवजात व सर्व सजीवसृष्टीची 'रचना' केली? आपण नक्की आहोत तरी कोण? आणि आपण इथेच, या पृथ्वीवरच का आहोत? फक्त पृथ्वीवरच आहोत की अजूनही कुठेतरी हीच सृष्टी एका वेगळ्या रूपात नांदते आहे? असे एक ना अनेक नानाविध प्रश्न. या प्रश्नांचा मागोवा घेण्याची आता खरंच वेळ आलेली आहे. जात, धर्म, वंश, हे सर्व बाजूला देऊन याचा पृथ्वीवरील सर्वात 'सुज्ञ' प्रजातीने विचार करायला हवा. जोपर्यंत काही ठोस वैज्ञानिक पुरावे मानवाच्या हाती लागत नाहीत, तोपर्यंत तरी आपण 'एलियन' ही एक कल्पना, किंवा 'फँटसी'च असेल. मात्र, या अमर्याद विश्वात आपण 'एकटे'च आहोत, असे म्हणणे म्हणजे निव्वळ मूर्खपणाच..!