ब्लॉगबद्दल थोडसं..


गेल्या काही महिन्यांपासून Network 18 च्या History TV वरील 'Ancient Aliens' ही मालिका चर्चेचा विषय ठरत आहे. त्यासोबतच याच वर्षाच्या सुरवातीला भारताच्या लडाख भागात भारत-चीन सीमेजवळ बऱ्याच सैनिकांना यूएफओ, म्हणजेच उडत्या तबकड्यांचे(अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट) दर्शन घडल्याचे ऐकिवात आले. विविध प्रसारमाध्यमांनी सुद्धा याविषयी बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. खगोलशास्त्राची आवड असल्यामुळे या विषयासंबंधीचे वाचन होतेच. बरेचदा मित्रांसोबत 'परग्रहवासी, भूत, देवदूत, पुराणकथा, धर्म, देव इत्यादी इत्यादी' विषयांवर तर्क लढवत बसायची सवय असल्याने मालिका व वर्तमानपत्रात तसेच न्यूज चॅनेलवर आलेल्या बातम्यांमुळे यासंबंधीची अधिकाधिक माहिती मिळवण्याचे ठरवले. मनाशी निश्चय केला आणि लागलो कामाला. तेव्हापासून आजपर्यंत नवनवी माहिती संपादन करणे चालू आहे व यापुढेही चालू राहील

या संगणकीय विश्वात आजकाल माहिती मिळवणे तेवढे अवघड उरले नाही. तरीही, भारतीय भाषांमध्ये माहिती उपलब्ध होणे तसे अवघडच..! इंग्रजी भाषेमध्ये मोठ्या प्रमाणावर यासंदर्भात माहिती उपलब्ध असूनही अशा गूढ, धार्मिक-वैज्ञानिक व विचार करायला लावणाऱ्या आणि चर्चेचा विषय असणाऱ्या बाबतीत मात्र भारतीय भाषा मागे पडतात याचे दुःख वाटले. त्यामुळेच, एक विरंगुळा म्हणून, अशा अज्ञात व गूढ विषयांसंबंधी मिळालेली माहिती, ज्ञान इतरांसोबतही वाटावे असा विचार करून या ब्लॉगची सुरवात करीत आहे.

जर आपणा कोणाकडेही या संदर्भात जर काही माहिती उपलब्ध असेल, अशा विषयांमध्ये काही अनुवभ आलेला असेल तर आपण मला kedarj71@gmail.com या ईमेलवर जरूर माहिती पाठवून अथवा संपर्क साधून सहकार्य करू शकता. जर माहिती ब्लॉगच्या विषयांशी साधर्म्य साधणारी असेल तर ती या ब्लॉगवर पोस्ट करण्यास आनंदच होईल.
आपला अभिप्राय नक्की कळवा.

केदार जोशी

No comments:

Post a Comment